लातूर येथे दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात बॅकिंग व उद्योग क्षेत्रातील करिअर या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
दयानंद वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालयात द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम विभागाच्यावतीने बँकिंग व उद्योग क्षेत्रातील करिअर या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. गंगाधर शेळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले की, द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम शिकत असतानाच बँकिंग क्षेत्रात करिअरच्या काय संधी आहेत, यांचे मार्गदर्शन लाभले तर जीवनाच्या व भविष्याच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलण्यासाठी निर्णय घेता येऊ शकतो हाच या व्याख्यानाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विठ्ठलजी हारडे (उपप्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया. ) यांनी विद्यार्थ्यांना आपले सेविंग अकाउंट बँकेत काढावे, त्यामुळे बँकेतील व्यवहाराची प्रत्यक्ष माहिती प्राप्त होईल. हे अकाउंट उघडण्यासाठी ते सर्व सेवा देतील अशी ग्वाही दिली. तसेच श्री कपिल अग्रवाल (प्रबंधक, विभागीय स्टेट बँक ऑफ इंडिया.) यांनी आपल्या मार्गदर्शनात बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा, मुलाखती, विविध स्तरावरील बढती प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर लातूर मधील सुप्रसिद्ध उद्योजक श्री आकाश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांनी उद्योगाची सुरुवात कशी करायची? कोणताही उद्योग सुरू करण्यापूर्वी त्या कामाचा अनुभव घेणे आवश्यक आहे. उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारच्या विविध योजना, वेबसाईट, प्राथमिक समस्या, फंड उभारणे, विविध प्रक्रिया त्यासंबंधीचे ऑनलाईन कोर्स यावर व्यापक विश्लेषण केले.
यानंतर दयानंद वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. अंजली बुरांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, इंजिनिअरिंग व इतर अनेक शाखेतील पदवीधर बँकिंग क्षेत्रात पदार्पण करत आहेत. तेव्हा आपण वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी तर या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. राजाराम पवार यांनी विद्यार्थ्यांनी नोकरी केली तर एक व्यक्ती कमवतो, परंतु उद्योग उभारला तर अनेकांना काम मिळू शकते. त्यामुळे
उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगावे असे मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम दयानंद कला महाविद्यालयातील सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुहास क्षिरसागर, प्रा. शिल्पा बनसोडे, प्रा. सुवर्णा कारंजे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. प्रा. सिद्धेश्वर ठाकूर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले, तर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कु. स्नेहा महाजन हिने केले.